Honar Soon Me Hya Gharchi Going To Off Soon

677
Honar sun me hya gharchi poster

रात्रीचे आठ वाजले की घराघरात वाजणारी ‘रोज रोज कसरत..’ ची धून आता बंद होणार आहे. श्री-जान्हवी यांची गाजलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ येत्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं वृत्त आहे.
15 जुलै 2013 ला प्रक्षेपित झालेल्या पहिल्या भागापासून ‘होणार..’ ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. नायक, नायिका आणि तिच्या सहा सासवा अशी आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेल्या झी मराठी वाहिनीला ‘होणार’ने टीआरपीचे आकडे वर ठेवण्यास साथ दिली.

चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, सर्वच कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिकेने आपलंसं केलं. मालिकेने नुकताच 750 भागांचा टप्पाही पार केला होता. झी मराठी अवॉर्डमध्ये अनेक पुरस्कार पटकावत प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मालिकेने मिळवली.
मध्यंतरीच्या काळात मालिकेला उतरती कळा लागली. जान्हवीचं बाळंतपण, नऊ महिन्यांपासून अधिक काळ लांबलेली तिची डिलीव्हरी यामुळे सोशल मीडियावरुन तिची खिल्ली उडवली जात होती. जान्हवीचा ‘काहीही हं श्री’ हा डायलॉग तर चांगलाच गाजला. त्यावरुन आलेले विनोद, उखाणे यांनी मालिकेइतकीच प्रेक्षकांची करमणूक केली.
झी मराठीवरील का रे दुरावे, जय मल्हार, चला हवा येऊ द्या सारख्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर कब्जा मिळवला आहे. शिवाय नव्याने दाखल झालेल्या नांदा सौख्यभरे, माझे पती सौभाग्यवती मालिकाही प्रेक्षकांना आवडू लागल्या आहेत. त्या तुलनेने ‘होणार सून’ मागे पडल्याचं म्हटलं जातं. कोणती नवीन मालिका श्री-जान्हवीची जागा घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
श्री आणि जान्हवी यांची व्यक्तिरेखा साकारणारे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान मालिका सुरु झाल्यानंतर गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोघं विभक्त होणार असल्याचंही वृत्त आलं.


 

सौजन्य : ABPMajha