The King Shiva coronation ceremony on a large screen at Mr. And Mrs. Sadachari

747

डोळे दिपवणारा शिव राज्याभिषेक सोहळा मोठ्या पडद्यावर 

शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला  जाणता राजा मिळाला आणि प्रजेच्या डोक्यावर छत्र  आले . तो क्षण आणि त्यावेळी झालेला तो अद्वितीय सोहळा ज्याचे अप्रतिम चित्रण शिवचरित्रात वाचायला मिळते. मात्र हा सोहळा लवकरच आपल्याला याचि  देही याचि डोळा पाहायला मिळणार आहे. ८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पुन्हा जिवंत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारं,  त्यांच्या लढवय्या वृत्तीची महती सांगणारे,  त्यांचे गौरवगान सादर करणारे ‘जगदंब’ हे गाणं नुकतंच गोरेगाव येथील फिल्मसिटीत चित्रित करण्यात आले. सिनेमातील आणि गाण्यातील मुख्य भूमिकेत वैभव तत्ववादी हा ‘शिवा’ या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. एका रांगड्या आणि अॅक्शन हिरोच्या तो रुपात दिसेल. गीतकार प्रणीत कुलकर्णी, संगीतकार पंकज पडघन आणि आदर्श शिंदे या त्रिकुटाने सिनेमातील ‘जगदंब’ या गाण्याला अप्रतिम संगीत दिले आहे. प्रचंड उर्जा, स्पुरण चढविणाऱ्या या गाण्याचे चित्रीकरण देखील तितकेच दमदार होणार आहे. सुभाष नकाशे यांचे अफलातून नृत्यदिग्दर्शन या गाण्याची जान आहे. वैभव सोबत सुमारे १५० डान्सर्स, पारंपारिक ढोल ताशे आणि सगळाच त्याकाळातील लवाजमा गाण्यात पाहायला मिळणार आहे. इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित आणि आशिष वाघ दिग्दर्शित सिनेमाचा काही भाग भारताबाहेरील अतिशय नयनरम्य ठिकाणी चित्रित झाला आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली असून रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनची  उत्तम भट्टी जमलेला हा सिनेमा आहे. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेता मोहन जोशी, विजय आंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात  असणार आहे.  सिनेमाची  धमाकेदार पटकथा आणि संवाद  प्रवीण विठ्ठल तरडे यांचे आहे.  येत्या वर्षात प्रेक्षकांना हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल.

 Photo Gallery :