Milind Gawali’s ‘Athang’ Poster,Trailer,And Music Launch

570
Milind Gawali's Athang Marathi Movie Poster

Milind Gawali’s ‘Athang’ Poster,Trailer,And Music Launch

मिलिंद गवळी यांच्या “अथांग”चे चित्रपती व्ही. शांताराम यांच्या जेष्ठ कन्या मधुरा पंडीत जसराज यांच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित! तर माजी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीराम गवळी यांच्या हस्ते संगीत प्रकाशित!

अभिनेता मिलिंद गवळी यांच्या अगामी “एका मल्टी व्हेंचर्स प्रा. लि.,” निर्मित “अथांग” या चित्रपटाचा फर्स्टलुक तसेच संगीत नुकतेच दादर येथील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात प्रकाशित करण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या जेष्ठ कन्या लेखिका – दिग्दर्शिका मधुरा पंडित जसराज यांच्या शुभ हस्ते चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. याच सोहळ्यात “अथांग”च्या संगीताचे प्रकाशन माजी सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीराम गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.  चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नातवाने म्हणजेच पंडित शारंग देव यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या संगीत आणि ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यासाठी त्यांची मुलगी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहिल्याने प्लाझातील संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. महत्वाचे म्हणजे चित्रपटसृष्टीला नवनवे आयाम  देणाऱ्या चित्रपतींनी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक अशी बलाढ्य आणि यशस्वी कारकीर्द घडविली आहे. आपल्या नव्या कारकिर्दीसाठी “प्लाझा” चित्रपटगृहाची निवड करून मिलिंदने हा दुग्दशर्करा योग साधला होता.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिलेल्या मधुरा जसराज म्हणाल्या, मला ह्या सोहळ्यासाठी उपस्थित राहताना विशेष आनंद होत आहे. मुख्य म्हणजे मिलिंद मला माझ्या मुलासारखा आहे. तो अतिशय गोड मुलगा आहे. बऱ्याच वर्षांपासूनचा आमचा परिचय आहे. माझ्या चित्रपटात मिलिंदने भूमिकाही केली आहे. त्याचा हा चित्रपट वेगळा तर असेलच पण यापुढे मिलिंदला प्रेक्षक दिग्दर्शक म्हणूनही स्वीकारतील आणि त्याला भरभक्कम पसंती देतील, त्याच्या या नव्या पर्वासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर चित्रपती व्ही. शांताराम आपले प्रेरणास्थान असल्याचे मिलिंदने सांगितले. या प्रसंगी सहनिर्माते चंद्रु तिल्वानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘कॅम्पस’, ‘परिवर्तन’, ‘मानो’ या न मानो’ इत्यादी हिंदी मालिकांसोबतच ‘वक्त से पेहले’, ‘चंचल’, ‘हम बच्चे हिंदुस्थान’ के’, ‘वर्तमान’, ‘अनुमती’ इत्यादी हिंदी व ‘आई’, ‘असंच पाहिजे नवं नवं’, ‘देवकी’, ‘मराठा बटालियन’, ‘विठ्ठल विठ्ठल’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ते आजच्या ‘ठण ठण गोपाळ’ पर्यंत एका पेक्षा एक ग्रामीण – शहरी चित्रपटांद्वारे आपली यशस्वी छाप रसिकांच्या मनात रुजविण्यात यशस्वी झाल्यानंतर अभिनेता मिलिंद गवळी पुन्हा एक वेगळी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. नैसर्गिक अभिनयाची देणगी आणि निरागस निर्मळ चेहरा असं वेगळ कॉम्बिनेशन म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी. त्याचा अगामी “एका मल्टी व्हेंचर्स प्रा. लि.,” निर्मित “अथांग” हा नवा चित्रपट येत्या २९ जानेवारी २०१६ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे अभिनय- निर्मिती -दिग्दर्शन अश्या तिहेरी भूमिकांमध्ये तो पहिल्यांदाच रसिकांसमोर येत आहे.

जाहिरात, मॉडेलिंग, दूरचित्रवाणी मालिका ते चित्रपट असा भरभक्कम प्रवास केल्यानंतरही काही तरी वेगळं देण्याच्या प्रयत्नातूनच “अथांग”ची निर्मिती केल्याचे मिलिंद सांगतो. अभिनय करताना मी नेहमीच दिग्दर्शकाला आणि त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्यांना पहिले स्थान दिले आहे. अथांग ची कथा ऐकून मी प्रभावीत झालो. ह्या कथेने माझ्यातल्या दिग्दर्शकाला वाट करून दिली आहे. या चित्रपटासाठी फक्त अभिनेता म्हणून मर्यादित न राहता दिग्दर्शन आणि निर्मितीतही मुशाफिरी करण्याची संधी मिळाल्याची भावना मिलिंद व्यक्त करतो. कलेवर श्रद्धा आणि प्रेम करणारा कलाकार नेहमीच असमाधानी असतो, साचेबद्ध कामात अडकण्यापेक्षा काहीतरी वेगळ करून आपल्या चाहत्यांची वाहवा मिळविण्यात त्याचा आनंद असतो. काहीसं मिलिंदच्या बाबतीही असंच म्हणता येईल. आजपर्यंत त्यांने जवळपास शंभराहून अधिक वेगवेगळ्या कलाकृतींतून अभिनय करूनही काहीतरी नवं देण्याची उमेद त्याच्यात आहे. कधी हिरो तर कधी बिघडलेला – लाडावलेला भाऊ – मुलगा तर कधी विनोदी छटा – व्यक्तिरेखा रंगवून त्याने भरपूर मनोरंजन केले आहे. पण तरीही अथांग सारखी कथा त्याला अस्वस्थ करते आणि नव्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी भाग पाडते.

“अथांग” एक वस्त्र आहे… मानवी मनाच्या आणि नात्याच्या गुंतागुंतीतून विणत गेलेलं…शिल्पा या अनाथ, हुशार चित्रकार मुलीच्या हिम्मतीची कथा “अथांग”मध्ये रेखाटली आहे. एका अनाहूत क्षणी तिला एक गुलाबपुष्प भेट मिळते आणि त्यानंतर तिचे आयुष्य एक नवे वळण घेते….अशी काहीशी संभ्रम तयार करणारी लाईन असलेल्या ह्या चित्रपटाची वीण खूप गुंतागुंतीची असून दिग्दर्शक मिलिंदने ती नाजूक आणि हळुवारपणे सोडविल्याचे पहायला मिळणार आहे.

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत तन्वी हेगडे, स्मिता शेवाळे, मिलिंद गवळी, अमित डोलावत, पूजा नायक, भूषण घाडी, मौसमी हडकर, शीतल गायकवाड, करिष्मा पाताडे(बाल कलाकार) तसेच पाहुणे कलाकार कन्नन अय्यर, प्रफुल सामंत, वंदना मराठे, रवी फलटणकर, सुझान बेर्नेट यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मिलिंदला सहनिर्माते चंद्रु तिल्वानी यांनी सोबत केली असून  डीओपी अनिकेत के आहेत. गीतकार केदार परुळेकर यांच्या शब्दांना प्रसिद्ध संगीतकार पंडित शारंग देव संगीत दिले आहे. अथांगसाठी शीर्षकगीत लहू – माधव या आघाडीच्या संगीतकार जोडीने दिले आहे. कथा प्रोफेसर वसंत हंकारे यांनी लिहिली असून त्यावर पटकथा लेखा त्रैलोक्य यांनी रचली आहे तसेच संवाद लेखा त्रैलोक्य व विनया मंत्री यांचे आहेत. साऊंड डीझायनिंगचे काम शैलेश सकपाळ यांनी केले असून पार्श्वसंगीत माधव विजय यांनी दिले आहे. संकलन सुबोध नारकर यांचे असून रंगभूषा नित्यानंद वैष्णव यांनी केली आहे. वेशभूषा महेश नारकर यांनी योगदान दिले असून डीआयसाठी कुंदन सिंग यांनी आपले कौशल्य वापरले आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश गुरसले यांनी केले असून कार्यकारी निर्माता शंकर धुरी आहेत. या सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनी करून गोडवा वाढविला.


Poster And Still Photos :