अहमदनगर महाकरंडक’ मध्ये
तरुणाईचा नाट्यजल्लोष
– यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष ; २ ते १० जानेवारीदरम्यान प्राथमिक फेरी
– एकूण तीन लाख रुपयांची पारितोषिके
– भरत जाधव स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर
तरुणाईच्या सर्जनशील नाट्यकृतींची सकस स्पर्धा अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेत रंगणार आहे. राज्यभरातील आठ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार आहे.
श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. अभिनेता भरत जाधव या स्पर्धेचे ‘ब्रँड अँबेसिडर’ आहेत.
स्पर्धेचे आयोजक व तरूण उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी स्पर्धेविषयी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समन्वयक स्वप्नील मुनोत या वेळी उपस्थित होते.
अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, कोल्हापूर, कोकण आणि औरंगाबाद या केंद्रांवर प्राथमिक फेरी २ ते १० जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यातील दर्जेदार २५ संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार आहे. माझे मन तुझे झाले फेम हरीश दुधाडे आणि लेखक दिग्दर्शक अभिजित दळवी प्राथमिक फेरीचे परीक्षण करणार आहेत. अंतिम फेरी नगर येथील माऊली सभागृहात २१ ते २४ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची पारितोषिके असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला ६१ हजार १११ रुपये आणि महाकरंडक प्रदान करण्यात येणार आहे.
‘एकांकिका स्पर्धांच्या विश्वामध्ये अहमदनगर महाकरंडक स्पर्धेने वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे. दरवर्षी या स्पर्धेच्या प्रतिसादात वाढ होत आहे. उत्तम व्यवस्थापन हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. अंतिम फेरीतील सर्व संघाच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे स्पर्धकांना पूर्ण स्पर्धेचा आनंद घेता येतो. ६१ हजार १११ रुपये एवढे मोठे पारितोषिक देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेने शहरी आणि ग्रामीण भागातील एकांकिका एका मंचावर आणले आहे. तसेच ग्रामीण भागातील नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी ही स्पर्धा पूरक ठरत आहे,’ असे फिरोदिया यांनी सांगितले.
‘चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात. त्यामुळे गुणवान कलाकारांना चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये काम मिळण्याची संधी निर्माण होते. शिवराज वायचळ, रूतुजा बागवे अशा काही कलाकारांना याच स्पर्धेतून त्यांची चंदेरी दुनियेतील वाटचाल सुरू केली,’ असेही फिरोदिया यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज ५ डिसेंबरपासून उपलब्ध होणार असून, नोंदणीसाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. प्रवेश अर्ज www.mahakarandak.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Leaflet