Khwada’s Poster Dedicated To Lalbaghcha Raja

749

चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि अक्षर फिल्म्सच्या सहयोगाने अस्सल मऱ्हाटी मातीतील चित्रपट ‘ख्वाडा’ येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २२ ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये सीमोल्लंघन करणार असून, या रांगड्या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आज तरुणांचे लाडके नेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते, मुंबईचे आराध्य दैवत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आले.

वेगळाच बाज असलेल्या या चित्रपटाची प्रसिद्धीही वेगवेगळ्या आणि अभिनव पद्धतीने सुरु आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ‘ख्वाडा’चे पोस्टर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. मुंबईतील तरुणांचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांनी सकाळी लालबागच्या राजा चरणी पोस्टर अर्पण करून, पोस्टरचे अनावरण केले. शेवाळे यांनी ‘ख्वाडा’च्या टीमला शुभेच्छाही दिल्या. चित्रपटाचे प्रेझेंटर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, चित्रपटाचे लेखक – निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, चित्रपटातील अस्सल मऱ्हाटी जोडी भाऊसाहेब शिंदे आणि नवतारका रसिका चव्हाण यावेळी उपस्थित होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकर यांनी साकारले आहे. ह्या पोस्टरसाठी विशेष फोटोसेशन प्रख्यात फोटोग्राफर अमित ठाकूर यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रेझेंटर चंद्रशेखर मोरे यांनी कला दिग्दर्शक म्हणून अठराशेहून अधिक जाहिरातपटांसाठी कलादिग्दर्शन केले असून, त्या संबधातूनच चांदोरकर यांनी खास हे पोस्टर तयार केले आहे. या कलाकृतीला अस्सल मऱ्हाटी मातीचा स्पर्श लाभला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘श्वास’ या चित्रपटाचे पोस्टर किरण चांदोरकर यांनी तयार केले होते. ‘सगळे कलाकार एकत्र आले की उत्कृष्ट कला निर्मिती होते, हे ‘ख्वाडा’च्या निमित्ताने सिद्ध होत आहे. ज्या सर्जनशीलतेतून भाऊराव यांनी हा चित्रपट तयार केला, त्याला साजेसे हे पोस्टर, चांदोरकर यांनी साकारले असून, लोकप्रिय खासदार राहुलजी शेवालेंच्या हस्ते आणि साक्षात राजाच्या आशीर्वादाने मायबाप रसिकांचे लक्ष वेधत असून रसिकांमध्ये  ख्वाडा विषयी अधिक उत्सुकता निर्माण होईल.” अशी भावना चंद्रशेखर मोरे यांनी व्यक्त केली.

‘ख्वाडा’ चित्रपटाला ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे ५ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात २०१५’ चार पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, आगळावेगळा खलनायक अनिल नगरकर सकारात आहेत तर मर्द मराठा नायक भाऊसाहेब शिंदे पदार्पण करीत आहे. यांशिवाय योगेश डिंबळे, रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. वीरधवल पाटील यांनी छायाचित्रण केले असून, संकलन रोहन पाटील यांनी, तर संदीप इनामके यांनी कला दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील गीत विनायक पवार यांनी लिहिले असून, संगीत रोहित नागभिडे यांनी दिले असून त्यावर आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढविला आहे. ध्वनी संयोजन महावीर सबनवार यांनी केले असून चंद्रकांत राऊत सहनिर्माते आहेत तर मंगेश जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत.