In Search Of Relationship – ‘Anurag’

351

नात्याच्या शोधात ‘अनुराग’

२१ जानेवारी २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला    

तब्बल १८ हजार ५०० फुटांवरील लेह लडाख येथे चित्रीकरण

पती पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीनं भाष्य करणारा ‘अनुराग’ हा चित्रपट नव्या वर्षात, २१ जानेवारी २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोनच व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात लेह-लडाखच्या नितांत सुंदर निसर्गाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

प्रदर्शनापूर्वीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ चित्रपटसृष्टी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दाखवण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. अंबरीश दरक, अभिनेत्री व प्रस्तुतकर्ती मृण्मयी देशपांडे, अभिनेता धर्मेंद्र गोहिल छायालेखक सुरेश देशमाने या वेळी उपस्थित होते. चित्रपटसृष्टीत येऊन पंचवीस वर्षे झाल्यानिमित्त सुरेश देशमाने यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. सेल्युलॉइड फिल्मपासून ते आताच्या डिजिटल कॅमेऱ्याच्या क्रांतीचे ते साक्षीदार आहेत. मराठीतील मोजक्या जाणकार छायालेखकांपैकी ते एक आहेत.

लग्नानंतरच्या एका टप्प्यावर पती पत्नीच्या नात्यात होणारी घुसमट, त्यावर त्यांनी काढलेला मार्ग या आशयसूत्रावर ‘अनुराग’ बेतला आहे. पती पत्नीच्या नात्याचा वेध अनेक चित्रपटांतून घेण्यात आला असला, तरी त्या पलीकडे जाऊन या नात्याचा वेगळ्या पद्धतीने विचार या सिनेमात करण्यात आला आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. अंबरीश दरक यांनी केले आहे. मृण्मयी देशपांडे आणि धर्मेंद्र गोहिल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  मृण्मयी देशपांडे यांनी चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे. गुरु ठाकूर यांनी गीत लेखन, समीर म्हात्रे यांनी संगीत-पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. आरआरपी कॉर्पोरेशन लिमिटेडची निर्मिती असलेला हा चित्रपट मृण्मयी देशपांडे क्रिएशन्सने प्रस्तुत केला आहे.

कलाप्रेमी व उत्तम वाचक असलेले डॉ. अंबरीश दरक प्रख्यात ‘आय स्पेशलिस्ट’ आहेत. मेडिकल प्रॅक्टिस उत्तम सुरू असताना चित्रपट करण्यामागील भूमिका डॉ. दरक यांनी मांडली. ‘मेडिकल प्रॅक्टिस करताना ‘मेड फॉर इचअदर’पासून पूर्णपणे स्वतंत्र अशी अनेक जोडपी भेटली. या सर्वांमध्ये एक साम्य होते. त्यातील बहुतेकांना नात्याचा उबग आल्याचे जाणवत होते. लग्नानंतर एका टप्प्यावर आल्यावर प्रेम गायब कसे होते, नात्यात अपुरेपणा का निर्माण होतो या विषयी प्रश्न पडू लागला. बदललेल्या या नात्यांविषयी काहीतरी करावे, या नात्यांचा पुन्हा एकदा शोध घ्यावा असे वाटत होते. त्या दरम्यान छायालेखक सुरेश देशमाने यांची भेट झाली. माझ्या डोक्यात असलेली कल्पना त्यांना सांगितली. देशमाने यांनी त्या कल्पनेवर उत्तम चित्रपट होऊ शकतो असे सांगितले. त्यामुळे चित्रपट करण्याचा निर्णय घेतला,’ असे डॉ. दरक यांनी सांगितले.

‘चित्रपटाची कथा मला खूपच आवडली. त्यामुळे अभिनय करण्याच्या निमित्ताने या चित्रपटाशी जोडली गेले. या चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर या टीमशी नाते घट्ट होत गेले. त्यामुळे अभिनय करण्यापलीकडे जाऊन चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरवले,’ अशी भावना मृण्मयी देशपांडे यांनी व्यक्त केली.

दोनच व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण समुद्रसपाटीपासून तब्बल १८  हजार ५०० फूट उंच असलेल्या लेह-लडाख येथे करण्यात आले आहे. लेह लडाखच्या नितांतसुंदर निसर्गाने चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उच्च निर्मितीमूल्य आणि उत्तम आशय यांचा मिलाफ ‘अनुराग’च्या रुपाने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


Photo :

anurag marathi movie