Welcome Bhau Shinde

1465

बंदे में हैं दम!

‘ख्वाडा’द्वारे रांगड्या भाऊ शिंदेचे पदार्पण

एक खेडूत तरुण शेती करीत असताना, अचानकपणे ‘फिल्म मेकिंग’चे शिक्षण काय घेतो, मित्राला मदत करण्यासाठी, सहाय्यक दिग्दर्शक बनतो आणि पुढे त्या चित्रपटाचा नायक म्हणून पुढे येतो काय? सारेच विलक्षण! ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी बाज असलेला ‘भाऊसाहेब’ हा नवा चेहरा मराठी चित्रसृष्टीत दाखल होत आहे.

‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी रफ एंड टफ चेहरा ‘भाऊसाहेबा’च्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीला सापडला आहे. कणखर पीळदार शरीरयष्टी असणारा भाऊ शिंदे  याच्या अभिनयाची जातकुळी अत्यंत वेगळी असून तरुण वर्गात त्याची क्रेझ होऊ लागली आहे.  सोशल मीडियात भाऊ लोकप्रिय होऊ लागला आहे. ग्रामीण ठसका आणि रांगडेपणा याची नजाकत असणारा त्याचा नायक २२ ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘भाऊ’च्या या पहिल्याच प्रयत्नावर प्रभात पुरस्काराची मोहोर उमटली आहे.

‘ख्वाडा’च्या नायकासाठी अनेक ऑडिशन्स झाल्या, पण कोणताही चेहरा पसंत पडत नव्हता आणि अचानक कऱ्हाडे यांचे ६४ किलो वजनाच्या भाऊसाहेबवर लक्ष गेले. कऱ्हाडे भाऊसाहेबाला म्हणाले, शुटिंग सुरु होईपर्यंत पुढच्या एका महिन्यात तुझे वजन ७५ किलो झाले, तर ‘बाळू’ची भूमिका तुला मिळेल. भाऊसाहेबाने तब्बल ७७ किलो पर्यंत वजन वाढविले आणि महाराष्ट्राला मिळाला नवा नायक ‘बाळू’ अर्थात भाऊ शिंदे. या नायकाची कहाणी काही वेगळीच आहे. ‘ख्वाडा’चा हा नायक, आजपर्यंत शेती करीत होता. त्याच्या आई-वडिलांना वाटायचे,भाऊने साहेब व्हावे, म्हणून त्यांनी, त्याचे नाव भाऊसाहेब ठेवले, मात्र त्याला दिग्दर्शक होण्याचे स्वप्न होते. ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्याच पावलावर पाय ठेऊन, भाऊसाहेबाने अहमदनगर येथील ‘न्यू आर्टस अॅन्ड सायन्स’ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मास कम्युनिकेशन चे शिक्षण पूर्ण केले आहे.

तडफदार रुबाबदार दिसणारा भाऊसाहेब आपल्या गावरान देह्बोलीमुळे शहरी तरुणाईत लोकप्रिय होऊ लागला आहे. भाऊ ह्या भूमिकेविषयी विषयी म्हणाला, कि “मी ‘ला स्ट्राडा’ हा  फ्रेडेरीको फेलीनीचा चित्रपट पहिला होता आणि त्यातील ‘जेलेटा मसिना’चा अभिनय आणि तरलपणा मला भावला होता. त्याचाच मला ही व्यक्तीरेखा साकारताना उपयोग झाला.”

दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, की प्रेक्षकांना जे हवे आहे, ते देणाऱ्या या चित्रपटामध्ये भाऊसाहेबाने व्यक्तिरेखेचे आव्हान लीलया पेलले असून, त्याने कोणतीही कसर सोडली नाही त्याची ही भूमिका पाहून प्रेक्षकच म्हणतील बंदे में हैं दम!


 Bhau Shinde Photos :