Political Based “Shasan” Coming Soon In Theaters

414
shasan multistarer

राजकारणावर आधारित ‘शासन’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 

निर्माता शेखर पाठक यांच्या श्रेया फिल्म्स प्रा. लि. निर्मिती आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित शासन सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या कलाकार मंडळीसोबत नुकताच एक छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यावेळी या सिनेमातील मोठी स्टारकास्ट अभिनेता मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत यांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी निर्माते शेखर पाठक मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शासन सिनेमा एखादी कथा, घटना किंवा गोष्ट सादर करणारी नसून भारतीय राजकारणाचे समाजातील मानसिकेतेवर होणारे परिणाम सांगणारी आहे. जी आपण सगळे कोणत्यातरी संदर्भात जगत असतो. शासन सिनेमातील प्रत्येक कलाकाराने ती व्यक्तीरेखा जगली आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे त्यांच्या भूमिकेविषयी म्हणाले, मी या सिनेमात आय. पी.  एस अधिकाराच्या भूमिकेत आहे. जो मंत्र्यांच्या फक्त मॅनेजर किंवा अरेंजर बनून जातो, या राजकारणातील डावपेचात त्याची होणारी ससेहोलपट या सिनेमातून दाखवली आहे. तसेच या सिनेमात पहिल्यांदा मोठ्या लांबीच्या नकारात्मक भूमिकेत भरत जाधव आपल्याला दिसणार आहेत. ही भूमिका दिल्याबद्दल दिग्दर्शक गजेंद्र यांचे सर्वप्रथम आभार मानले. ‘आतापर्यंत मला विनोदी, गंभीर, मध्यम धाटणीच्या भूमिका मिळाल्या होत्या, मात्र शासन सिनेमात ब्लेक शेड मध्ये दाखवले असल्याचे भरत जाधव यांनी सांगितले. पोलिस बनण्याचे स्वप्न बाळगणा-या अनेक खेडोपाड्यातील तरुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धार्थ जाधवने या सिनेमातून पोलिसांचे आयुष्य तसेच त्यांची मानसिकता मांडली असल्याचे सिद्धार्थ म्हणाला. हा सिनेमा राजकरणावर आधारित असून यात मी पत्रकाराच्या भूमिकेत असल्याचे मानवाने सांगितले. या सिनेमातून ख-या अर्थाने पत्रकारांचे आयुष्य मी जगले असल्याचे मानवाने सांगितले  शिवाय जितेंद्र जोशी सोबत माझी पूर्वीपासून मैत्री असून या सिनेमात त्याच्यासोबत काम करायला मज्जा आल्याचे ती म्हणाली. जितेंद्र जोशी यानेही आपल्या भूमिकेविषयी सांगताना सर्वप्रथम सिनेमाच्या पटकथेचे आणि दिग्दर्शनाचे कौतुक केले. ‘साडेमाडेतीन नंतर सिद्धार्थ, मकरंद आणि मी पुन्हा एकदा शासन च्या निमित्ताने एकत्र आलो असल्याचे जितेंद्र जोशीने सांगितले. तसेच भरत जाधव सोबत काम  करण्याची इच्छा पूर्ण झाली असल्याचेही जितेंद्रने सांगितले. मात्र शासन सिनेमात भरतसोबत काम केलं तरी माझी इच्छा पूर्ण झाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. अदिती भागवत हिने आपल्या भूमिकेविषयी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘या सिनेमात मला दिग्दर्शकांनी अगदी वेगळ्या रंगाढंगांमध्ये लोकांसमोर आणले आहे. या सिनेमातील माझी भूमिका अगदी अव्हानास्पद अशीच होती, त्यासाठी दिग्दर्शकांनी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतली. शासन सिनेमात मी डान्सर नाही तर काहीशा भडक भूमिकेत दिसणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद त्यांनीच लिहिली आहे. सिनेमात वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे,  किरण करमरकर यांच्यासारख्या कसदार कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मराठीतील ख्यातनाम कवी आणि साहित्यिक विं दा करंदीकर यांची ‘माझ्या मना बन दगड’…. ही कविता सिनेमात संगीतबद्ध करण्यात आली आहे. या कवितेला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिला असून जसराज जोशी यानी ते गायल आहे. त्याचप्रमाणे  नरेंद्र भिडे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले असून जयदीप वैद्य यांनी सिनेमातील इतर गाणी गायली आहे. एकंदरच दिग्गज कलाकारांनी नटलेला असा शासन हा सिनेमा १५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे.

Photo Gallery :