Katta acting to “Cinderella” !!

456

अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने दिग्दर्शन आणि निर्मितीत पदार्पण!! 

कट्टा म्हणजे चार चौघात रंगलेल्या बेसुमार गप्पा, पण कट्ट्याची हि व्याख्या बदलायला भाग पडणारा असा अभिनय कट्टा. एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे. नाट्य व चित्रपट सृष्टीत पदार्पण करत असताना, एक नवोदित कलाकार म्हणून स्वत:च स्थान निर्माण करत असताना, येणारी सारी आव्हाने पेलत; मालिका, चित्रपट, आणि पडदयाआड कार्यभार सांभाळत एक यशस्वी व्यक्तित्व साकारले. पण ‘कुठेतरी या प्रवासाला किमान दुसऱ्यांसाठी सुकर करता आले तर….’ या प्रयत्नातून अभिनय कट्टा जन्माला आला.
दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर करत ५९०० हूनही जास्त पात्रं रंगवत, २३५ कट्ट्याचा विक्रम या अभिनय कट्ट्याने केला. ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवयाला सुरुवात केली. तसेच हा कट्टा पत्रकारांच्या लेखणीची पसंती बनला. प्रख्यात दिग्दर्शकांच्या नि सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या कौतुकाला पात्र ठरला. कलाकारांची पंढरी, मूल्यांना व संस्कुतीला जपत फक्त कलाकार नव्हे तर माणूस घडवणारी संस्था अशी ओळख अभिनय कट्ट्याने निर्माण केली.
अवघ्या पाच वर्षात नाट्य क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहचलेला कट्टा आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हे अभिनय कट्ट्याचे कलाकार फक्त थिएटर आर्टिस्ट न राहता सिने आर्टिस्ट बनणार आहेत कारण अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्ट्याचे आहेत. यावेळी कट्ट्याचे हे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.
“सिंड्रेला” या वैशिष्ठ्यपूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. हा सिनेमा फक्त अभिनय कट्ट्यालाच नवी ओळख देणार नसून, कट्ट्याचे लाडके संचालक, गुरु व सूत्रधार श्री किरण नाकती यांच्या व्यक्तित्वाचेही नवे पैलू समोर घेऊन येत आहे. कारण सदर सिनेमाची कथा,पटकथा व दिग्दर्शक या तिन्ही भूमिका त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या आहेत.
“सिंड्रेला” या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही “खरी कथा की परी कथा” हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक  उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या
भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही  आपल्याला पहायला मिळणार  आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Photo Gallery